महाराष्ट्र

Sanjay Raut On Ind vs Pak Asia Cup 2025: भारतविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाला किती कोटी रुपये मिळाले?; संजय राऊतांनी सांगितला धक्कादायक आकडा!

Sanjay Raut On Ind vs Pak Asia Cup 2025: पाकिस्तान जिंकला-पराभूत झाला याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. अशा सामन्यावर आम्ही थुंकतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut On Ind vs Pak Asia Cup 2025: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) काल भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने विजय मिळवला. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी अनेक देशवासीयांची भावना होती. मात्र सरकारनं बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्याची बीसीसीआयला परवानगी दिल्यानं आशिया चषकात खेळवण्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर देशभरातून अनेक चाहत्यांची पाकिस्तानविरुद्ध खेळू नका, अशा भावना व्यक्त केल्या. देशभरातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. परंतु टीम इंडियाच्या खेळाडूंनी सर्व भारतीयांच्या भावनेचा आदर केला. सामना जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणं देखील टाळलं. सदर प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 1000 कोटी रुपये मिळाले- संजय राऊत

तुम्ही पाकिस्तानविरुद्ध खेळून आमच्याविरुद्ध लढण्यासाठी, आमच्या महिलांचं कुंकु पुसण्यासाठी  त्यांना सक्षम करताय. पाकिस्तान जिंकला-पराभूत झाला, याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. अशा सामन्यावर आम्ही थुंकतो, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. पैशांसाठी खेळले, एका सामन्यावर बहिष्कार टाकू शकले नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यावर काल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळण्यात आला. या दीड लाख कोटी रुपयांमधील अधिकृतपणे 1000 कोटी रुपये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मिळाले. तसेच या दीड लाख कोटी रुपयांमधून साधारण 25 हजार कोटी रुपये पाकिस्तानात गेले, असा दावाही संजय राऊतांनी केला. आता हाच पैसा आपल्याविरुद्ध वापरला जाणार, असं संजय राऊत म्हणाले.

हस्तांदोलन केलं नाही, हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर झालं का?- संजय राऊत

भारतीय क्रिकेट संघाची खेळण्याची इच्छा नसली तरी सरकारने परवानगी दिल्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध खेळली, असं सुनील गावसकरांनी सांगितले. जर सरकारने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास परवानगी दिली नसती, तर टीम इंडिया खेळली नसती, असंही सुनील गावसकर म्हणाल्याचं संजय राऊतांनी सांगितले. टीम इंडियाने हस्तांदोलन केलं, नाही याचं भाजपवाले कौतुक सांगताय. देशाची जनता मुर्ख आहे का?, तुम्ही पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळलात ना?, देशासाठी लोकांनी रक्त सांडलं, फासावर गेले, अनेक लोक शहीद झाले..आणि तुम्ही हस्तांदोलन केलं नाही, त्याचं कौतुक करताय, हे हस्तांदोलन केलं नाही, हे काही पहलगाम हल्ल्यावरील उत्तर झालं का?, असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली-

सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. मला काहीतरी सांगायचं आहे आणि त्यासाठी हे ठिकाण अधिक योग्य आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांना भावपूर्ण श्रद्धांजली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबांसोबत आम्ही ठामपणे उभे आहोत. हा विजय आम्ही आपल्या शूरवीर सैन्यदलाला समर्पित करू इच्छितो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ते आम्हाला सतत प्रेरणा देत राहोत आणि आम्हालाही संधी मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवण्यासाठी आणखी कारण देता यावं, अशी आम्ही आशा करतो, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!