देश

बापू कोल्हापुरात जाऊन मराठा समाजाची जागा काढून का घेताय? अशोकराव मानेंना राजूबाबा आवळेंनी घेरलं; ठाकरे गटाचे रविकिरण इंगवले आणि खासदार मानेंमध्येही शाब्दिक चकमक

वाठार तर्फ वडगावमधील साडेसात एकर जागा बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला भाडेपट्टीवरती देण्यात आली. मात्र, या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत साखळी उपोषण सुरू केलं होतं.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगावमधील गायरान जमीन एका खासगी शिक्षण संस्थेला दिल्यानंतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. गावकऱ्यांनी उपोषणा सुरू केल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडगा काढण्यात आला. गावकऱ्यांनी केलेल्या कडाडून विरोधानंतर त्या संस्थेनं जमीन परत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या जमिनीवरून झालेल्या वादात एकमेकांना डिवचण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. माजी आमदार राजू बाबा आवळे आणि विद्यमान आमदार अशोकराव माने यांच्यामध्ये झालेली खडाजंगी चर्चेचा विषय ठरला. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि खासदार धैर्यशील माने यांच्यामध्येही कलगीतुरा रंगला. त्यामुळे गावच्या गायरान जमिनीवरून झालेला वाद चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत साखळी उपोषण सुरू केलं

वाठार तर्फ वडगावमधील साडेसात एकर जागा बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला भाडेपट्टीवरती देण्यात आली. मात्र, या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत साखळी उपोषण सुरू केलं होतं. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक बोलावण्यात आली. मात्र, या बैठकीमध्येच माजी आमदार आणि विद्यमान आमदारांमध्ये कोल्हापुरातील जागेवरून चांगलाच वाद रंगला.  कोल्हापुरात विश्व पंढरीसमोरील मराठा भवांसाठी प्रस्तावित असलेली जागा हातकणंगल मतदारसंघाचे विद्यमान शिंदे गटाचे आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यात आल्याने कोल्हापूरमध्ये सुद्धा कडाडून विरोध सुरू आहे. या जागेविरोधात मराठा समाजाकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं आणि ही जागा मराठा समाजासाठीच असल्याची सांगत आमदार अशोकराव माने यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा या जिल्हाधिकारी गायरान जमिनीवरून वाद सुरु असतानाच बैठकीमध्ये निघाल्याने चांगलीच चर्चा रंगली.

बापू कोल्हापुरात जाऊन जागा का काढून घेता?

राजू बाबा आवळे यांनी या जागेवरून बोलताना आमदार अशोकराव माने यांना घेरत बापू कोल्हापुरात जाऊन जागा का काढून घेता? अशी विचारणा केली. यावेळी अशोकराव माने यांनी हा विषय इथं काढायचा नाही. मी ती जमीन घेतलेली नाही, असं प्रत्युत्तर अशोकराव माने यांनी दिलं. यावेळी एका गावकऱ्याने सुद्धा अशोकराव माने यांना कोंडीत पकडले. तुमच्या प्रचारासाठी आम्ही गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या. मात्र, तुम्ही आमची दखल घेतली नाही. बापू हळूच गावात येतात. कुठेतरी बसतात आणि भजी खाऊन जातात. मात्र, आपल्या उपोषणाला भेट द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही.’ यावेळी अशोकराव माने निरुत्तर झाल्याचे दिसून आले.

खासदार धैर्यशील मानेंवर संताप

दरम्यान, या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले आणि शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्यातही चांगलाच वाद झाला. माने  यांच्यावर गावकऱ्यांनी सुद्धा हल्लाबोल केला. ‘दहीहंडीच्या कार्यक्रमाला जायला तुमच्याकडे वेळ आहे. मात्र, गावकऱ्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला वेळ नाही. तुमच्या निवडणुकीत आम्ही रॅली काढून तुम्हाला मतदान केले. पण, तुम्ही गावात फिरकला सुद्धा नाही,’ अशा शब्दांत ग्रामस्थांनी खासदार धैर्यशील माने यांना सुनावले. यावर खासदार माने म्हणाले की, ‘मी दिल्लीमध्ये अधिवेशनात होतो. त्यामुळे बैठक घेता आली नाही. मात्र, मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.’ त्यानंतर ग्रामस्थांनी आक्षेप घेत माने यांना चांगलेच धारेवर धरले.

इतर महत्वाच्या बातम्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!