महाराष्ट्र

IPS महिला अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले DCM

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत.

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी अखेर व्हायरल व्हिडिओवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोलापूर (solapur) जिल्ह्याच्या कुर्डू गावात बेकायदा मुरुम उपशावरील कारवाई थांबविण्यासाठी गावातील काहींनी थेट अजित पवारांना फोन केला होता. त्यावेळी, अजित पवारांनी त्याठिकाणी असलेल्या आयपीएस महिला अधिकारी अंजली कृष्णा यांना फोनवरुन कारवाई थांबविण्याचे आदेश दिले होते. तसेच, आपकी इतनी डेरिंग असे म्हणत दादागिरीचीही भाषा केली होती. त्यामुळे, कर्तव्यदक्ष आणि रोखठोक असलेल्या अजित पवारांवर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. महिला पोलीस (IPS) अधिकाऱ्याचा असा अवमान योग्य नसल्याचंही अनेकांनी म्हटलं. आता, अजित पवारांनी या व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसेच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच, मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घटनेवरुन विरोधकांनी ट्विट करुन अजित पवारांना लक्ष्य केलं होतं, तर खासदार संजय राऊतांनी अजित पवारांची शिस्त आता कुठ गेली, असा सवाल उपस्थित केला होता. अखेर, सर्वच स्तरातून टीका होऊ लागल्याने अजित पवारांनी एक्सवर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

काय आहे प्रकरण?

गावातील मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र, त्यांना अजित पवारां आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूँ. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फोन पर कॉल करें.. त्यावर पवार म्हणताहेत.. की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी.. मेरा चेहरा तो पेहचानोगी ना.. असे अजित पवार रागवेलल्या सुरात बोलले. त्यानंतर, अजित पवारांनी व्हिडीओ कॉल केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अजित पवारांनी आता स्पष्टीकरण देत महिला पोलीस अधिकाऱ्याची पाठराखण केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!